भारतीय अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे. स्वातंत्र्य पुर्वकाळात शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नव्हते म्हणुन कर्जात जन्मलेला शेतकरी कर्जातच मृत्युमुखी पडत होता. ब्रिटीशांनी शेतीमालासाठी स्वतंत्र बाजारपेठा निर्माण केल्या नव्हत्या. त्यामुळे शेतक-यांची पिळवणुक मोठ्या प्रमाणावर होत होती. अनियमित निसर्गाशी झगडा देऊन त्याने पिकविलेला माल व्यापारी मनमानी भावाने खरेदी करीत असत. वेळप्रसंगी वस्तु विनिमय होत असे. शेतक-याला बाजारभावाची कल्पना नसायची. त्य़ामुळे सतत दारीद्रयात जीवन कंठणे त्याच्या नशिबी होते.
महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा लढा तीव्र केला. जनतेच्या मनात स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण झाली. राज्या-राज्यात मंत्रीमंडळे स्थापन होऊ लागली. राज्य कारभारात शेतकरी वर्गातुन निवडुन दिलेले प्रतिनिधी दिसु लागले. त्यांनी शेती विकासाचा ध्यास घेतला होता. त्यातुनच सन 1939 साली शेतीमालाच्या विक्रीस आवश्यक असणा-या बाजारपेठेचा विचार होऊन बॉम्बे अँग्रीकल्चरल प्रोड्युस मार्केट अँक्ट संमत केला गेलाआणि ख-या अर्थाने शेतक-यांना दिलासा लाभला.
सन 1947 साली देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य चळवळीची जागा मग सहकार चळवळीने घेतली. त्याकाळात लासलगांव परिसरातील शेतकरी, व्यापारी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्या प्रयत्नाने दि. 01 एप्रील, 1947 रोजी स्वर्गीय बळवंतराव भिकाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली.
त्यानुसार मुंबई शासन राजपत्र भाग 4-ब मध्ये 340 व्या पानावर गव्हर्नर, मुंबई यांनी प्रसिध्द केलेली तारीख 16/05/1947 रोजीची अधिसुचना क्रमांक 9543/39 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव जिल्हा नाशिक असे परीशिष्ट क्रमांक 01 मध्ये नमुद केलेले आहे. लासलगांव बाजार समितीच्या प्रत्यक्ष कामकाजास दि. 01 मे, 1947 रोजी सुरूवात करण्यात आली.