new-img

लासलगांव सर्वसाधारण माहिती

प्रस्तावना :-   

            'लासलगांव' हे नांव ऐकले की, आठवतो तो अहिल्यादेवी होळकरांचा भुईकोट किल्ला, प. पु. भगरीबाबांसारख्या महान तपस्वी संताचे सानिध्य आणि सुप्रसिध्द कांदा. नाशिक पासुन अवघ्या 60 कि. मी. अंतरावर शिवनदीच्या तिरी नैसर्गिक व सांस्कृतीक अशा दोन्ही घटकांनी समृध्द असलेल्या लासलगांवने सर्वांगीण विकास साधत जगाच्या नकाशावर आपले वेगळे स्थान निश्चित केलेले आहे. लासलगांव परीसर हा सुरूवातीपासुनच व्यापारी केंद्र म्हणुन प्रसिध्द होता व आहे. रेल्वे स्टेशन, वाहतुक व्यवस्था, पोष्ट, बँका, भाभा अणुसंशोधन केंद्र संलग्न कृषक प्रकल्प, राष्ट्रीय फलोद्यान संशोधन व विकास प्रतिष्ठानची शाखा या सुविधांमुळे येथील बाजारपेठ विकसित झालेली आहे. 

ऐतिहासिक पार्श्वभुमी :-       

 
लासलगांव मुख्य दरवाजा

            18 व्या शतकात होळकरांच्या साम्राज्या-तील लासलगांव एक महत्वाचे संरक्षणाचे केंद्र होते. त्या काळातील भुईकोट किल्ला अजूनही सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या निर्मितीबरोबर गावाची निर्मिती झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.  ऐतिहासिक काळापासुन लासलगांव बाजारपेठ प्रसिध्द आहे. निजामाच्या साम्राज्यातुन लासल -गांव बाजारपेठेत मालविक्रीस येत असे. तसेच मुंबईहुन अनेक व्यापारी आणि दलाल माल खरेदीसाठी लासलगांवला येत असत. लासलगांव मध्य लोहमार्गावर स्थानक असुन सन 1873 मध्ये 15,550 टन मालाची व सन 1881 मध्ये 19,737 टन मालाची लोहमार्गाने वाहतुक झाल्याचे पुरावे आहेत.     

भौगोलिक पार्श्वभुमी :-   

            लासलगांवचे अक्षवृत्तीय स्थान 20° ´ 07¢ उत्तर व रेखावृत्तीय स्थान 74° ´ 14¢ आहे. लासलगांव दख्खन पठाराच्या पश्चिमेस असुन, पश्चिम घाटाच्या वात्सम्मुख बाजुस सुमारे 50 कि. मी. अंतरावर सह्याद्री पर्वत रांगा आहेत. तसेच समुद्रसपाटीपासुन 590.46 मीटर उंचीवरील मैदानी प्रदेश आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 476.3 मि. मी. असुन 83 टक्के पर्जन्य जुन ते सप्टेंबर महिन्यात होते. लासलगांव शहर शिवनदीच्या काठावर वसलेले आहे. लासलगांवची लोकसंख्या 24,240 आहे. नैसर्गिक घटकांच्या अनुकूलतेमुळे लासलगांवची उत्पत्ती होऊन विकास होत आहे. मध्यवर्ती बाजारपेठेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी वरील भौगोलिक पार्श्वभुमीचे योगदान महत्वाचे आहे.